नाशिक : सणासुदीच्या पार्श्वभूमीवर अन्नपदार्थांमधील भेसळ रोखण्यासाठी अन्न व औषध प्रशासनाने (FDA) नाशिकमध्ये मोठी कारवाई केली आहे. रविवार पेठ परिसरात करण्यात आलेल्या तपासणीत 397.60 किलो संशयास्पद तुपाचा साठा जप्त करण्यात आला आहे. या तुपाची किंमत तब्बल ₹2 लाख 75 हजार 812 रुपये असल्याची माहिती प्रशासनाने दिली.
अन्न व औषध प्रशासनाने सणासुदीच्या काळात भेसळयुक्त आणि कमी दर्जाच्या अन्नपदार्थांची विक्री रोखण्यासाठी विशेष मोहीम सुरू केली आहे. याच मोहिमेअंतर्गत सोमवार, 10 ऑगस्ट रोजी रविवार पेठ येथील संजय भागचंद बरूड यांच्या ठिकाणी तपासणी करण्यात आली.
अन्न परवाना नसताना तुपाचा साठा
तपासणीदरम्यान संबंधित ठिकाणी अन्न परवाना नसताना विविध ब्रँडचे तूप विक्रीसाठी साठवून ठेवल्याचे आढळून आले. तूप कमी दर्जाचे असल्याचा संशय आल्याने FDA पथकाने तातडीने कारवाई करत तुपाचा साठा जप्त केला.
जप्त करण्यात आलेल्या साठ्यामध्ये KMP कृष्णा काऊ तूप, माधुली काऊ तूप आणि श्रीमायी काऊ तूप या तीन ब्रँडचा समावेश आहे. या तुपाचे नमुने पुढील तपासणीसाठी प्रयोगशाळेत पाठवण्यात आले आहेत.
प्रयोगशाळेचा अहवाल प्राप्त झाल्यानंतर संबंधितांवर पुढील कायदेशीर कारवाई करण्यात येणार असल्याचे अन्न व औषध प्रशासनाकडून सांगण्यात आले.
नांदगाव तालुक्यात 196 लिटर दूध नष्ट
दरम्यान, ग्रामीण भागातही अन्न व औषध प्रशासनाकडून तपासणी मोहीम राबवण्यात आली. 7 ऑगस्ट रोजी नांदगाव तालुक्यातील अनकवाडे येथे दूध विक्रेते चंद्रकांत गरुड यांच्या ठिकाणी तपासणी करण्यात आली.
यावेळी संबंधित ठिकाणी विनानोंदणी व्यवसाय सुरू असल्याचे तसेच अत्यंत अस्वच्छ वातावरणात दूध साठवण्यात आल्याचे आढळून आले. प्राथमिक तपासणीत दूध मानकांपेक्षा कमी दर्जाचे असल्याचे निदर्शनास आल्याने गाईच्या दुधाचे नमुने तपासणीसाठी घेण्यात आले.
दरम्यान, उर्वरित 196 लिटर दुधाचा साठा जागीच नष्ट करण्यात आला.