नाशिकमध्ये औषध कंपन्यांची ₹१.७३ कोटींची फसवणूक; बनावट कागदपत्रांच्या आधारे उद्योगपतीला गंडा

नाशिकमध्ये ₹१.७३ कोटींची फसवणूक; बनावट कागदपत्रांनी औषध कंपन्यांना गंडा

नाशिक | प्रतिनिधी

नाशिकच्या अशोकस्तंभ परिसरात बनावट कागदपत्रे, खोटी माहिती आणि बनावट प्रमाणपत्रांच्या आधारे गुजरातमधील औषध उत्पादक कंपन्यांची ₹१ कोटी ७३ लाख ७० हजार ३४३ रुपयांची फसवणूक झाल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. या प्रकरणी सरकारवाडा पोलिस ठाण्यात तिघांविरुद्ध फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास सुरू आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपींनी अशोकस्तंभ येथील कार्यालय स्वतःच्या मालकीचे असल्याचा बनाव करून तसेच बनावट ISO प्रमाणपत्रे, ई-मेल आणि वेबसाईटच्या माध्यमातून विश्वास संपादन केला. जर्मनी आणि नवी दिल्ली येथे झालेल्या आंतरराष्ट्रीय प्रदर्शनात सहभागी झाल्याचा खोटा दावा करून त्यांनी कंपन्यांचा विश्वास जिंकला.

यानंतर Pregabalin, Telmisartan, Levosulpiride आणि Etoricoxib या औषधांच्या मोठ्या ऑर्डर देण्यात आल्या. माल स्वीकारल्यानंतर पुढील तारखेचे धनादेश देण्यात आले. मात्र धनादेश वटण्यापूर्वीच आरोपींनी कार्यालय बंद करून पलायन केले. बँकेत धनादेश सादर केल्यानंतर ते वटले नसल्याचे समोर आले आणि फसवणुकीचा प्रकार उघडकीस आला.

या प्रकरणात प्लाझा इंडस्ट्रीज प्रा. लि. कंपनीची सुमारे ₹७७.५१ लाख, तर जीवनपाल स्पेशालिटी मॉलिक्युल्स एलएलपी कंपनीची ₹९६.१९ लाख अशी एकूण ₹१.७३ कोटींची फसवणूक झाल्याचे तक्रारीत नमूद करण्यात आले आहे.

सरकारवाडा पोलिसांनी तिघांविरुद्ध भारतीय न्याय संहिता (BNS) अंतर्गत गुन्हा नोंदवून पुढील तपास सुरू केला आहे.