पंचवटी | नाशिक : प्रेयसीने प्रियकराला फॅशनेबल राहण्याचा सल्ला दिला आणि त्यानंतर दोघांमध्ये दुरावा निर्माण झाला. रुसलेल्या प्रेयसीची मनधरणी करण्यासाठी एका प्रेमवीराने चक्क दिंडोरी रोडवर ‘सॉरी’ लिहिलेले निनावी होर्डिंग विनापरवानगी लावल्याचा प्रकार समोर आला आहे.
गेल्या आठवड्यात दिंडोरी रोडवरील एका महाविद्यालयाबाहेर रात्रीतून गुलाबी हृदयाच्या चित्रासह निळ्या अक्षरात ‘सॉरी’ असा मजकूर असलेले होर्डिंग झळकले. निनावी होर्डिंगमुळे पंचवटी परिसरात तसेच सोशल मीडियावर या प्रकाराची चांगलीच चर्चा रंगली.
पोलिसांनी या प्रकरणाचा तपास सुरू केला असता, प्रियकराला त्याच्या प्रेयसीने चांगले कपडे घालावे आणि फॅशनेबल राहावे, असा सल्ला दिल्याचे समोर आले. यावरून दोघांमध्ये शाब्दिक वाद झाला आणि त्यानंतर प्रेयसीने अबोला धरल्याचे तपासात निष्पन्न झाले.
प्रेयसीची समजूत काढण्यासाठी प्रियकराने अनेक प्रयत्न केले. मात्र, तिच्याकडून कोणताही प्रतिसाद मिळत नसल्याने त्याने भन्नाट शक्कल लढवली. महाविद्यालयाकडे जाणाऱ्या रस्त्यावर रात्रीतून ‘सॉरी’ लिहिलेले होर्डिंग लावून त्याने प्रेयसीची माफी मागण्याचा प्रयत्न केला.
१२ सीसीटीव्ही कॅमेऱ्यांची तपासणी
या प्रकरणाचा छडा लावण्यासाठी पोलिसांनी परिसरातील दहा ते बारा सीसीटीव्ही कॅमेऱ्यांचे फुटेज तपासले. एका सीसीटीव्ही फुटेजमध्ये मालवाहू वाहनातून होर्डिंगची वाहतूक होत असल्याचे पोलिसांच्या निदर्शनास आले. वाहनाच्या क्रमांकाच्या आधारे तपास करत पोलिस प्रेमवीरापर्यंत पोहोचले.
संशयित विद्यार्थ्याला पोलिस ठाण्यात आणून त्याला नोटीस देत कारवाई करण्यात आल्याचे सूत्रांनी सांगितले. हा तरुण अभियांत्रिकीचे शिक्षण घेत असल्याची माहिती समोर आली आहे.
प्रेम, अबोला अन् ‘सॉरी’चे होर्डिंग!
प्रेयसीने अबोला धरल्याने मनस्ताप झालेल्या या प्रेमवीराने माफी मागण्यासाठी वेगवेगळे प्रयत्न केले. मात्र, प्रतिसाद न मिळाल्याने त्याने थेट रस्त्यावर होर्डिंग लावून ‘सॉरी’ म्हणण्याची अनोखी कल्पना प्रत्यक्षात आणली. मात्र, विनापरवानगी होर्डिंग लावल्याने प्रेमाची ही अनोखी शक्कल त्याच्यावर पोलिस कारवाईपर्यंत पोहोचली.
या प्रकरणी म्हसरूळ पोलिस ठाण्यात विद्रुपीकरण केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे.