Leopard News : वणीतील सप्तशृंगी नगरात बिबट्याची दहशत; कुत्र्याला ओढून नेल्याचा संशय

Leopard

वणी शहरातील सप्तशृंगी नगर परिसरात बिबट्याचा Leopard वावर आढळून आल्याने नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. भोई हॉस्पिटलजवळ उभ्या असलेल्या कारखालील कुत्र्याला बिबट्याने ओढून नेल्याचा संशय व्यक्त केला जात असून, घटनास्थळी बिबट्याच्या पावलांचे ठसे आणि झटापटीचे संकेत आढळून आले आहेत.

मंगळवारी मध्यरात्री साडेबारा ते एक वाजेच्या सुमारास परिसरातील कुत्रे जोरजोरात भुंकत होते. काही वेळाने अचानक कुत्र्यांच्या भुंकण्याचा आवाज बंद झाला. सकाळी रहिवाशांनी परिसरात पाहणी केली असता नेहमी दिसणारे एक कुत्रे गायब असल्याचे निदर्शनास आले. गेल्या काही दिवसांत परिसरातून तीन ते चार कुत्री गायब झाल्याचे नागरिकांनी सांगितले.

गणेश देशमुख, मनोज खांडवी आणि राहुल मोरे यांनी रात्री कुत्र्यांच्या भुंकण्याचा आवाज अचानक बंद झाल्याचे सांगितले. तसेच अनिल राठोड यांच्या घरातील पाळीव कुत्र्यानेही बिबट्याची चाहूल लागताच लपून बसल्याचे त्यांनी सांगितले.

घटनेची माहिती दिंडोरीचे आरएफओ सुशांत पाटील यांना देण्यात आली. त्यांच्या सूचनेनुसार वनपाल सुनील पवार यांनी वनरक्षक ज्योती झिरवाळ यांना घटनास्थळी पाहणीसाठी पाठवले. वनरक्षक झिरवाळ यांनी परिसराची पाहणी करून नागरिकांशी चर्चा केली. यावेळी बिबट्याच्या ये-जा करण्याचे पावलांचे ठसे आढळून आले.

सप्तशृंगी नगरालगत मोकळे प्लॉट, नदी आणि दाट झाडे-झुडपे असल्याने बिबट्याला लपण्यासाठी पोषक वातावरण असल्याचे दिसून येत आहे. त्यामुळे नागरिकांनी रात्रीच्या वेळी विशेष काळजी घ्यावी, लहान मुलांवर लक्ष ठेवावे आणि एकट्याने बाहेर पडणे टाळावे, असे आवाहन वन विभागाकडून करण्यात आले आहे.

बिबट्याचा वावर लक्षात घेऊन आवश्यकतेनुसार पिंजरा लावण्यात येणार असल्याचेही वन विभागाने सांगितले आहे.