MD Drugs : नांदूरशिंगोटे परिसरात एमडी सदृश अमली पदार्थासह एकाला अटक; ७० हजारांचा मुद्देमाल जप्त

Nandurshingote MD News: एमडी सदृश अमली पदार्थासह एकाला अटक; ७० हजारांचा मुद्देमाल जप्त

नाशिक : नांदूरशिंगोटे परिसरात विनापरवाना एमडी (MD Drugs) सदृश अमली पदार्थ बाळगून त्याची विक्री करण्याच्या उद्देशाने वाहतूक करणाऱ्या एकास वावी पोलिसांनी ताब्यात घेतले. प्रदीप सोपान हेरोळे (३५, रा. निंभोरा स्टेशन, ता. रावेर, जि. जळगाव, हल्ली रा. माउली लॉन्स, अंबड, नाशिक) असे ताब्यात घेतलेल्या संशयिताचे नाव आहे. त्याच्याकडून ३.७८ ग्रॅम एमडी सदृश पदार्थ, मोबाईल, रोख रक्कम आणि मोटरसायकल असा एकूण ७० हजार ८ रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, २२ ऑगस्ट रोजी सायंकाळी सव्वासहाच्या सुमारास नाशिक-संगमनेर रोडवरील हॉटेल प्रियालजवळ, निमोण नाका, नांदूरशिंगोटे येथे पोलिसांनी ही कारवाई केली.

प्रदीप हेरोळे याच्याकडे पारदर्शक झिपर प्लास्टिक पिशवीत पांढऱ्या-पिवळसर रंगाची स्फटिक पावडर आढळून आली. या पदार्थाला उग्र वास असून तो एमडी MD Drugs अर्थात मॅफेड्रोन सदृश पदार्थ असल्याचे पोलिसांनी नमूद केले. पिशवीसह या पदार्थाचे वजन ३.७८ ग्रॅम असून त्याची अंदाजे किंमत २२ हजार रुपये असल्याचे पोलिसांनी सांगितले.

याशिवाय ८ हजार रुपये किमतीचा व्हिवो कंपनीचा मोबाईल, ८ रुपये रोख आणि ४० हजार रुपये किमतीची बजाज सीटी १०० मोटरसायकल असा मुद्देमाल जप्त करण्यात आला.

पोलिसांच्या फिर्यादीनुसार, निखिल गुंजाळ (पूर्ण नाव व पत्ता माहीत नाही) याच्या सांगण्यावरून प्रदीप हेरोळे याने अमली पदार्थ विक्रीच्या उद्देशाने जवळ बाळगून मोटरसायकलवरून वाहतूक केल्याचे तपासात समोर आले आहे.

याप्रकरणी वावी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास पोलिस उपनिरीक्षक प्रमोद सरोवर करीत आहेत. पोलिस शिपाई गणेश पवार यांनी फिर्याद दिली.

सहाय्यक पोलिस निरीक्षक आशिष शेळके यांच्या मार्गदर्शनाखाली उपनिरीक्षक प्रमोद सरोवर, छगन चव्हाण, पोलिस हवालदार शहाजी शिंदे, राहुल निरगुडे, कैलास गोरे, किरण पवार, हेमंत फड आदींच्या पथकाने ही कारवाई केली.