नाशिक | प्रतिनिधी
नाशिक स्थानिक स्वराज्य संस्था मतदारसंघाच्या विधान परिषद निवडणुकीसाठी महायुतीतील जागावाटपाचा तिढा अद्याप कायम असतानाच भाजपचे BJP इच्छुक उमेदवार गणेश गिते यांनी उमेदवारी अर्ज दाखल केल्याने पक्षातच खळबळ उडाली आहे. महायुतीत जागा कोणाच्या वाट्याला जाणार याबाबत स्पष्टता नसतानाही गिते यांनी अर्ज भरल्याने राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आले आहे.
गणेश गिते यांनी माध्यमांशी बोलताना भाजपचे वरिष्ठ नेते यांनी दिलेल्या शब्दानुसार उमेदवारी अर्ज दाखल केल्याचे सांगितले. विशेष म्हणजे त्यांनी भाजपच्या उमेदवार म्हणून तसेच अपक्ष उमेदवार म्हणून स्वतंत्र अर्ज दाखल केल्याची माहिती समोर आली आहे.
दरम्यान, नाशिक विधान परिषद मतदारसंघाची जागा भाजप BJP, शिंदे गटाची शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार गट) या तिन्ही पक्षांकडून मागितली जात असल्याने महायुतीसमोर पेच निर्माण झाला आहे. त्यामुळे अंतिम उमेदवार कोण असणार याबाबत अद्याप निर्णय झालेला नाही.
गणेश गिते यांच्या अर्जामुळे भाजपमधील अंतर्गत नाराजीही उघड झाल्याची चर्चा सुरू आहे. त्यांच्या उमेदवारी अर्जासाठी काही भाजप पदाधिकारी आणि नगरसेवकांनी सूचक-अनुमोदक म्हणून स्वाक्षऱ्या केल्याने पक्षांतर्गत वाद निर्माण झाला आहे. पक्षाच्या अधिकृत आदेशाशिवाय या स्वाक्षऱ्या देण्यात आल्याचा आरोप होत असून संबंधितांच्या भूमिकेवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले जात आहे.
भाजपमधील एका गटाने या प्रकारावर नाराजी व्यक्त केली असून भविष्यातील पक्षीय नियुक्त्या आणि पदवाटप करताना या घटनेची दखल घेतली जावी, अशी मागणीही अंतर्गत बैठकीत होत असल्याची चर्चा आहे.
उमेदवारी अर्ज भरण्याची अंतिम मुदत १ जून असल्याने रविवारी किंवा सोमवारी सकाळपर्यंत महायुतीत जागावाटपाचा अंतिम निर्णय होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. त्यामुळे नाशिकच्या राजकारणात पुढील काही तास अत्यंत महत्त्वाचे ठरणार आहेत.