भारताच्या स्टार्टअप विश्वातील एकेकाळचे चमकदार नाव असलेल्या Byju’s चे संस्थापक Byju Raveendran यांना सिंगापूरमधील न्यायालयाने मोठा धक्का दिला आहे. न्यायालयाचा अवमान (Contempt of Court) केल्याप्रकरणी त्यांना सहा महिन्यांच्या तुरुंगवासाची शिक्षा सुनावण्यात आली असून 70,500 डॉलरचा दंडही ठोठावण्यात आला आहे.
ब्लूमबर्गच्या रिपोर्टनुसार, बायजू रवींद्रन यांनी न्यायालयाचे अनेक आदेश पाळले नसल्याचे सिंगापूर कोर्टाने नमूद केले आहे. यामध्ये Beeaar Investco Pte या कंपनीतील त्यांच्या मालकीचे पुरावे सादर करण्याचे आदेश देण्यात आले होते. मात्र, संबंधित कागदपत्रे वेळेत न सादर केल्याने न्यायालयाने कठोर भूमिका घेतली.
गुंतवणूकदारांसोबत वाद वाढले
सध्या Byju’s विविध देशांतील गुंतवणूकदारांसोबत कायदेशीर संघर्षात अडकली आहे. कतार इन्व्हेस्टमेंट अथॉरिटीच्या (QIA) उपकंपनीनेही सिंगापूरमध्ये कंपनीविरोधात कायदेशीर कारवाई सुरू केली आहे. याचदरम्यान कंपनीमध्ये मोठ्या प्रमाणावर कर्मचाऱ्यांना कामावरून कमी करण्यात येत असल्याने आर्थिक अडचणी अधिकच समोर येत आहेत.
अमेरिकन न्यायालयाकडूनही मोठा धक्का
गेल्या वर्षी अमेरिकेतील डेलावेअर न्यायालयानेही Byju Raveendran यांच्यावर मोठी कारवाई केली होती. न्यायालयाने 1 अब्ज डॉलरपेक्षा अधिक रक्कम परत करण्याचे आदेश दिले होते. चौकशीदरम्यान आवश्यक कागदपत्रे वेळेत न सादर केल्याने त्यांच्यावर 533 दशलक्ष डॉलर आणि अतिरिक्त 540.6 दशलक्ष डॉलरची जबाबदारी निश्चित करण्यात आली होती.
अब्जावधींच्या कंपनीची घसरण
2019 मध्ये Byju’s ला ‘युनिकॉर्न’ दर्जा मिळाला होता. 2022 पर्यंत कंपनीचे मूल्यांकन तब्बल 22 अब्ज डॉलरपर्यंत पोहोचले होते. मात्र, त्यानंतर आर्थिक संकट, वाढते कर्ज, गुंतवणूकदारांचे वाद आणि व्यवस्थापनातील समस्यांमुळे कंपनीची प्रतिमा ढासळली.
WhiteHat Jr. व्यवहारावरही प्रश्न
एका मुलाखतीत Byju Raveendran यांनी 2021 मध्ये घेतलेले 1.2 अब्ज डॉलरचे कर्ज हा चुकीचा निर्णय असल्याचे मान्य केले होते. तसेच WhiteHat Jr. च्या अधिग्रहणातून अपेक्षित यश मिळाले नसल्याचेही त्यांनी सांगितले.
एकेकाळी भारतीय शिक्षण क्षेत्रात डिजिटल क्रांती घडवणारी कंपनी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या Byju’s साठी सध्या हा सर्वात कठीण काळ मानला जात आहे.