नाशिक : Tata Consultancy Services (TCS) आयटी कंपनीतील महिला कर्मचार्यांच्या कथित लैंगिक शोषण आणि जबरदस्तीने धर्मांतर प्रकरणात तपासाला नवे वळण मिळाले आहे. मुख्य संशयित निदा खान हिला आश्रय दिल्याच्या आरोपावरून छत्रपती संभाजीनगर येथील नगरसेवक मतीन पटेल आणि घरमालक हानिफ खान यांची विशेष तपास पथकाने (SIT) सोमवारी दिवसभर कसून चौकशी केली.
तपासाच्या अनुषंगाने एसआयटीने दोघांचे मोबाईल फोनही ताब्यात घेतले असून, त्यातील कॉल रेकॉर्ड, सोशल मीडिया चॅट आणि संपर्कांची माहिती तपासली जात आहे. या बहुचर्चित प्रकरणात आधीच पाच आरोपी न्यायालयीन कोठडीत आहेत.
मुख्य संशयित निदा खान ही घटनेनंतर फरार झाली होती. तपासादरम्यान तिचा मुंब्रा, सोलापूर मार्गे छत्रपती संभाजीनगरपर्यंत प्रवास झाल्याचे समोर आले. अखेर एसआयटीच्या पथकाने तिला छत्रपती संभाजीनगरमधील नरेगाव परिसरातून अटक केली होती.
मतीन पटेल यांच्याशी संपर्क कसा झाला?तपास यंत्रणेकडून निदा खानने मतीन पटेल यांच्याशी संपर्क कसा साधला, याची सखोल चौकशी करण्यात येत आहे. मोबाईल कॉल, सोशल मीडिया किंवा अन्य माध्यमांचा वापर झाला का, याचाही तपास सुरू आहे. तसेच या संपर्कात कोणाची मध्यस्थी होती का, याबाबतही चौकशी करण्यात आली.
सूत्रांच्या माहितीनुसार, तपासादरम्यान मतीन पटेल यांचा निदा खानच्या मावशीशी मोबाईलवर संपर्क झाल्याचेही निष्पन्न झाले आहे. त्यामुळे या प्रकरणातील इतर संभाव्य दुव्यांचाही शोध घेतला जात आहे.
तपासाला वेग
देशभरात खळबळ उडवून देणार्या या प्रकरणाचा तपास एसआयटीकडून वेगाने सुरू असून, आरोपींना मदत करणाऱ्या व्यक्तींवरही कारवाई होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.