Nashik : शहरासह इतर भागात आश्रम आणि मठ स्थापन करून अंधश्रद्धा पसरवत लोकांचे मानसिक, आर्थिक आणि धार्मिक शोषण केल्याप्रकरणी भोंदूबाबा कमलेश महाराज अधिकारी आणि त्याची पत्नी गौरी अधिकारी यांच्या विरोधात Nashik इंदिरानगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीच्या (अंनिस) प्रयत्नांमुळे हा गंभीर प्रकार उघडकीस आला आहे.
फिर्यादीनुसार, सोलापूर जिल्ह्यातील लऊळ येथील मदन देवकर आणि ज्ञानेश्वर देवकर यांच्या आई-वडिलांचे २०२१ मध्ये अल्पावधीत निधन झाले होते. त्यामुळे दोन्ही भाऊ मानसिक भीतीमध्ये होते. याच परिस्थितीचा फायदा घेत कमलेश अधिकारी याने “दैवी दोष”, “मृत्यूयोग” आणि “गुप्तधनावरील अतृप्त आत्मे” अशा गोष्टी सांगून त्यांना जाळ्यात ओढल्याचा आरोप आहे.
पीडितांना उज्जैन येथे बोलावून स्मशानभूमीत अघोरी पूजा करण्यात आली. जळत्या चितेजवळ चार दिवस विविध विधी करत पशूंचे बळी दिल्याचा आरोप फिर्यादींनी केला आहे. या पूजेसाठी तब्बल दीड लाख रुपये उकळण्यात आले. त्यानंतर पिंपळखेड आणि त्र्यंबकेश्वर येथील आश्रमांमध्येही अघोरी विधी करण्यात आल्याचे समोर आले आहे.
याचदरम्यान पीडितांना भीती दाखवत त्यांच्या नावावरील दोन एकर जमीन मठ बांधण्याच्या नावाखाली स्वतःच्या नावावर करून घेतल्याचा गंभीर आरोप आहे. तसेच आश्रमात जबरदस्तीने ठेवून घरगुती कामे करून घेतल्याचाही दावा करण्यात आला आहे.
या प्रकरणात कमलेश अधिकारी याची पत्नी गौरी अधिकारी हिचाही सहभाग असल्याचे तपासात समोर आले आहे. पीडितांनी अंनिसच्या कार्यकर्त्यांशी संपर्क साधल्यानंतर हा प्रकार उघड झाला. त्यानंतर अंनिसचे कार्यकर्ते पीडितांना घेऊन इंदिरानगर पोलीस ठाण्यात पोहोचले.
प्रभारी Nashik पोलीस निरीक्षक मनोहर कारंडे यांनी प्रकरण गांभीर्याने घेत जादूटोणा विरोधी कायद्यानुसार गुन्हा दाखल केला. या प्रकरणाचा तपास सहायक पोलीस उपनिरीक्षक युवराज शिरसाठ करीत आहेत.
अंनिसचे डॉ. टी. आर. गोराणे, कृष्णा चांदगुडे, ॲड. बाबासाहेब नन्नावरे, अनुप खैरनार, महेंद्र दातरंगे, रंजन लोंढे आणि ॲड. सुशीलकुमार इंदवे यांनी पीडितांना मदत केली.