Godavari River Pollution : गोदावरी नदी प्रदूषणाविरोधात ठाकरे गटाचे रामकुंड येथे आंदोलन; प्रशासनाला दिला इशारा

ड्रेनेजचे सांडपाणी नदीत सोडल्याचा आरोप, तातडीच्या उपाययोजनांची मागणी
नाशिक | प्रतिनिधी
गोदावरी नदीत (Godavari River) ड्रेनेजचे तसेच दुर्गंधीयुक्त सांडपाणी सोडले जात असल्याचा आरोप करत शिवसेना (ठाकरे गट) नगरसेवक, पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनी रामकुंड परिसरात आंदोलन केले. गोदावरी नदीचे वाढते प्रदूषण, नदीपात्रातील अस्वच्छता आणि भाविकांच्या आरोग्याशी होत असलेली खेळवणूक याकडे प्रशासनाचे लक्ष वेधण्यासाठी हे आंदोलन करण्यात आले.
‘दक्षिण गंगा’चे पावित्र्य धोक्यात ,(
‘दक्षिण गंगा’ म्हणून ओळखल्या जाणाऱ्या गोदावरी नदीचे पावित्र्य धोक्यात आले असून विविध ठिकाणांहून नदीपात्रात सांडपाणी मिसळत असल्याने नदीचे पाणी दूषित होत असल्याचा आरोप आंदोलकांनी केला. यामुळे नदीतील जलप्रदूषण दिवसेंदिवस वाढत असून पर्यावरणासह धार्मिक महत्त्वालाही धोका निर्माण झाला आहे.
भाविकांच्या आरोग्याचा प्रश्न ऐरणीवर
रामकुंड आणि गोदावरी घाट परिसरात दररोज हजारो भाविक स्नान व विविध धार्मिक विधींसाठी येतात. मात्र नदीतून येणारी दुर्गंधी आणि वाढते प्रदूषण यामुळे भाविकांच्या आरोग्याचा गंभीर प्रश्न निर्माण झाला असल्याचे शिवसेना पदाधिकाऱ्यांनी सांगितले.
महापालिकेविरोधात घोषणाबाजी
आंदोलनादरम्यान महापालिका प्रशासनाविरोधात जोरदार घोषणाबाजी करण्यात आली. गोदावरी नदीत मिसळणारे ड्रेनेजचे पाणी तात्काळ बंद करावे, नदी प्रदूषण रोखण्यासाठी प्रभावी उपाययोजना कराव्यात तसेच प्रदूषणास जबाबदार असलेल्या घटकांवर कठोर कारवाई करावी, अशी मागणी आंदोलकांनी केली.
आंदोलन तीव्र करण्याचा इशारा
या आंदोलनात शिवसेना (ठाकरे गट) शहरातील सर्व नगरसेवक, पदाधिकारी आणि कार्यकर्ते सहभागी झाले होते. प्रशासनाने वेळेत ठोस पावले उचलली नाहीत तर आगामी काळात आणखी तीव्र आंदोलन छेडण्यात येईल, असा इशारा गटनेते केशव पोरजे यांनी दिला.
प्रशासनाच्या भूमिकेकडे लक्ष
गोदावरी नदी प्रदूषणाचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आल्याने याबाबत प्रशासन कोणती भूमिका घेते आणि प्रदूषण रोखण्यासाठी कोणती ठोस पावले उचलते, याकडे नागरिक आणि भाविकांचे लक्ष लागले आहे.