Nashik Crime News : विवाहाचे आमिष, छळ आणि ५० लाखांच्या खंडणीप्रकरणी दोघांविरुद्ध गुन्हा

नाशिक | प्रतिनिधी

विवाहाचे आश्वासन देत एका तरुणीचा शारीरिक व मानसिक छळ केल्याप्रकरणी तसेच तिच्याकडे ५० लाख रुपयांची खंडणी मागितल्याच्या आरोपावरून नाशिकरोड पोलिसांनी दोघांसह अन्य साथीदारांविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, चांदवड तालुक्यातील २७ वर्षीय तरुणीची २०१७ मध्ये अविनाश वसंत निर्भवणे याच्याशी ओळख झाली होती. कालांतराने दोघांमध्ये प्रेमसंबंध निर्माण झाले. मात्र, या काळात संशयिताने वेळोवेळी तिचा मानसिक आणि शारीरिक छळ केल्याचा आरोप फिर्यादीत करण्यात आला आहे.
फिर्यादीनुसार, जुलै २०२५ मध्ये तरुणीच्या इच्छेविरुद्ध विवाह लावण्यात आला. त्यानंतरही तिचा छळ सुरूच ठेवण्यात आला. तसेच तिचे फोटो आणि व्हिडिओ सोशल मीडियावर प्रसारित करण्याची धमकी देत ५० लाख रुपयांची मागणी करण्यात आल्याचे तक्रारीत नमूद आहे.
याशिवाय, पीडितेच्या कुटुंबीयांशी तसेच तिचे ठरलेले लग्न असलेल्या कुटुंबाशी संपर्क साधून दिशाभूल करणारी माहिती देण्यात आली. त्यामुळे तिचे लग्न मोडल्याचाही आरोप करण्यात आला आहे.
या प्रकरणी नाशिकरोड पोलीस ठाण्यात अविनाश वसंत निर्भवणे, राहुल दवे आणि इतर साथीदारांविरुद्ध भारतीय न्याय संहितेच्या विविध कलमांन्वये गुन्हा दाखल करण्यात आला असून सहाय्यक पोलीस निरीक्षक किरण कोरडे पुढील तपास करीत आहेत.