Breaking Farmers Protest : रिंग रोडबाधित शेतकऱ्यांचा एल्गार! दुसऱ्या दिवशीही ठिय्या; ‘मुख्यमंत्र्यांची सविस्तर बैठक होईपर्यंत हटणार नाही’

FarmersProtest

पाऊस-ऊनाची पर्वा न करता शेतकरी आंदोलनस्थळी (Farmers Protest); किसान सभा, मनसेसह विविध पक्षांचा पाठिंबा

नाशिक : नाशिक परिक्रमा मार्ग (रिंग रोड) आणि हायवे क्रमांक २९ बाधित शेतकऱ्यांचे (Farmers Protest) ठिय्या आंदोलन दुसऱ्या दिवशीही सुरूच आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासोबत सविस्तर बैठक होऊन ठोस निर्णय होत नाही, तोपर्यंत आंदोलन मागे घेणार नाही, असा निर्धार शेतकऱ्यांनी व्यक्त केला आहे. पाऊस, ऊन आणि प्रतिकूल परिस्थितीची पर्वा न करता शेतकरी आणि महिला आंदोलनस्थळी ठामपणे बसून आहेत.

रिंग रोड आणि हायवे क्रमांक २९ बाधित शेतकऱ्यांच्या मागण्यांवर अद्याप ठोस तोडगा निघालेला नसल्याने प्रशासनासमोर पेच निर्माण झाला आहे. या आंदोलनाला किसान सभा आणि महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने जाहीर पाठिंबा दिला आहे.

किसान सभेचे राजू देसले, मनसेचे नेते सुदाम कोंबडे तसेच राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे सुनील कोथमीरे यांनी आंदोलनस्थळी उपस्थित राहून शेतकऱ्यांची भेट घेतली आणि आंदोलनाला पाठिंबा दर्शविला.

मुख्यमंत्र्यांसोबत सविस्तर बैठकीची मागणी (Farmers Protest)

पालकमंत्री गिरीश महाजन यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासोबत बैठक घडवून आणण्याचे आश्वासन दिल्यानंतर शेतकऱ्यांनी यापूर्वीचे उपोषण मागे घेतले होते. मुख्यमंत्र्यांसोबत एक बैठक झाली असली तरी त्यानंतर अपेक्षित असलेली सविस्तर बैठक अद्याप झालेली नाही, त्यामुळे शेतकऱ्यांमध्ये नाराजी आहे.

शेतकऱ्यांच्या मागण्यांवर ठोस निर्णय घेऊन रिंग रोडचा प्रश्न तातडीने मार्गी लावावा, अशी मागणी आंदोलनकर्त्यांनी केली आहे.

‘पालकमंत्र्यांना रक्षाबंधनासाठी वेळ, पण शेतकरी महिलांसाठी नाही?’

आंदोलनकर्त्या महिलांनी पालकमंत्री गिरीश महाजन यांच्यावरही नाराजी व्यक्त केली. “पालकमंत्र्यांना रक्षाबंधनासाठी वेळ आहे; मात्र न्यायासाठी इंदिरानगर पोलिस ठाण्याबाहेर बसलेल्या शेतकरी महिलांना भेटण्यासाठी वेळ नाही,” अशी खंत महिलांनी व्यक्त केली.

रक्षाबंधनाच्या निमित्ताने मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना राखी बांधून आपल्या घर-संसार आणि शेतीचे रक्षण करण्याचे आवाहन करण्यासाठी शेतकरी महिला मुंबईकडे रवाना झाल्या होत्या. मात्र, मुख्यमंत्र्यांची भेट होऊ शकली नसल्याने महिलांमध्ये नाराजी आहे.

‘लाडकी बहीण’ योजनेवरूनही सवाल

मुख्यमंत्र्यांची भेट न झाल्याने आंदोलनकर्त्या महिलांनी ‘लाडकी बहीण’ योजनेवरून सरकारला सवाल केला.

“लाडकी बहीण ही केवळ राजकारण आणि मतांसाठी आहे का? न्याय मागणाऱ्या त्याच लाडक्या बहिणींचा आर्त आवाज शासन कधी ऐकणार?” असा प्रश्न महिलांनी उपस्थित केला.

तीन शेतकऱ्यांच्या मृत्यूचा आंदोलकांचा दावा

रिंग रोडच्या प्रश्नामुळे निर्माण झालेल्या नैराश्यातून पिंपळगाव खांब येथील संपत नथू बोराडे, प्रेमा गोपाळ बोराडे आणि रेखा रामदास मुंडे या तीन शेतकऱ्यांचे अनुक्रमे २२, २३ आणि २४ ऑगस्ट रोजी निधन झाल्याचा दावा आंदोलनकर्त्यांनी केला आहे.

आंदोलनस्थळी या तिन्ही शेतकऱ्यांना श्रद्धांजली अर्पण करण्यात आली. या घटनांमुळे आंदोलकांमध्ये दुःख आणि संतापाचे वातावरण निर्माण झाले आहे.

“शासनाला आणखी किती शेतकऱ्यांचे बळी पाहिजेत?” असा सवाल आंदोलनकर्त्यांनी केला.

‘निर्णयास होणारा विलंब आता शेतकऱ्यांच्या जिवावर बेतत आहे’

छावा क्रांतिवीर सेनेचे संस्थापक अध्यक्ष करण गायककर म्हणाले, “मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे सक्षम आणि कार्यक्षम नेते असून, ते सकारात्मक दृष्टिकोनातून रिंग रोडचा प्रश्न सोडवतील, असा शेतकऱ्यांना आजही विश्वास आहे. मात्र निर्णयास होणारा विलंब आता शेतकऱ्यांच्या जिवावर बेतत आहे. आम्हाला आणखी शेतकरी गमवायचे नाहीत. मुख्यमंत्र्यांनी तातडीने हस्तक्षेप करून शेतकऱ्यांशी चर्चा करावी.”

आंदोलनात शिवा तेलंग, नवनाथ शिंदे, शिवाजी मोरे, प्रवीण पाटील, वैभव दळवी, योगेश गांगुर्डे, भारत पिंगळे, गोरख जाधव, आकाश जाधव, शुभम देशमुख, सोमनाथ बोराडे यांच्यासह विविध पक्षांचे पदाधिकारी सहभागी झाले होते.

शेतकऱ्यांच्या मागण्यांवर मुख्यमंत्री स्तरावर तातडीने बैठक घेऊन ठोस निर्णय होतो का, याकडे आता नाशिकचे लक्ष लागले आहे.