Nashik Kumbh Mela : ठक्कर डोम येथे २८ ते ३० ऑगस्टदरम्यान तीन दिवसीय महोत्सव; कीर्तन, अभंगवारी, भजन, गुरबाणी आणि नट संकीर्तनाची मेजवानी
नाशिक : नाशिककर, भाविक, विद्यार्थी आणि सांस्कृतिक रसिकांसाठी ‘सिंहस्थ महाकुंभ भक्ती संगम’ हा तीन दिवसीय भक्ती-सांस्कृतिक महोत्सव पर्वणी ठरणार आहे. नाशिक-त्र्यंबकेश्वर कुंभमेळा (Kumbh Mela) प्राधिकरणातर्फे २८ ते ३० ऑगस्टदरम्यान ठक्कर डोम येथे या महोत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे. विशेष म्हणजे, या कार्यक्रमासाठी कोणतेही प्रवेशशुल्क आकारले जाणार नसून तिकीट किंवा प्रवेशिका आवश्यक नाही.
महोत्सवाचे उद्घाटन २८ ऑगस्ट रोजी दुपारी ४.३० वाजता मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते होणार आहे. उद्घाटनानंतर विविध संतपरंपरा, भक्तिसंगीत आणि सांस्कृतिक कार्यक्रमांची मेजवानी नाशिककरांना अनुभवता येणार आहे.
२८ ऑगस्टला ‘अभंगवारी’ची रंगत (Kumbh Mela)
महोत्सवाच्या पहिल्या दिवशी, २८ ऑगस्ट रोजी सायंकाळी ५.३० ते ७ या वेळेत प. पू. अमृताश्रम स्वामी महाराज यांचे कीर्तन होणार आहे. त्यानंतर रात्री ८ ते १० या वेळेत राहुल देशपांडे यांची ‘अभंगवारी’ रंगणार आहे.
२९ ऑगस्टला संतपरंपरेवर विचारमंथन
२९ ऑगस्ट रोजी ‘भक्ती संमेलन’ आयोजित करण्यात आले आहे. या माध्यमातून भारतीय संतपरंपरा, समरसता तसेच राष्ट्रीय दृष्टिकोनातून संतपरंपरेचा सहभाग आणि समन्वय या विषयांवर विचारमंथन होणार आहे.
सायंकाळी ५ ते ७ या वेळेत ह.भ.प. डॉ. चारुदत्त गोविंदस्वामी आफळे यांचे कीर्तन, तर रात्री ८ ते १० या वेळेत कु. मैथिली ठाकूर यांचा भजनाचा कार्यक्रम होणार आहे.
पंजाबपासून मणिपूरपर्यंत भक्तिपरंपरांचा संगम
३० ऑगस्ट रोजी विविध राज्यांच्या भक्तिपरंपरांचे दर्शन घडणार आहे. दुपारी ३ ते ८ या वेळेत श्री दरबार साहिब, अमृतसर येथील भाई मनिंदर सिंहजी हजुरी रागी यांचे गुरबाणी शबद कीर्तन होणार आहे.
यानंतर सायंकाळी ४ ते ५ या वेळेत मणिपूर येथील नट संकीर्तन महाजेग्याचे सादरीकरण होईल. सायंकाळी ५ ते ७ या वेळेत ह.भ.प. निवृत्ती महाराज इंदुरकर यांच्या कीर्तनाने महोत्सवाची सांगता होणार आहे.
महाराष्ट्राच्या कीर्तन आणि अभंगवारीपासून पंजाबच्या गुरबाणी शबद कीर्तनापर्यंत तसेच मणिपूरच्या पारंपरिक नट संकीर्तनापर्यंत विविध भक्तिपरंपरा एकाच व्यासपीठावर येणार आहेत. त्यामुळे हा महोत्सव नाशिककरांसाठी आध्यात्मिक आणि सांस्कृतिक मेजवानी ठरणार आहे.
‘कुंभ हा सर्वांचा उत्सव’
नाशिक-त्र्यंबकेश्वर कुंभमेळा (Kumbh Mela) प्राधिकरणाचे आयुक्त शेखर सिंह म्हणाले, “कुंभ हा सर्वांचा उत्सव आहे. विविध भागांतील भक्तिपरंपरा एकाच व्यासपीठावर आणणारा ‘सिंहस्थ महाकुंभ भक्ती संगम’ नाशिककरांनी प्रत्यक्ष अनुभवावा, यासाठी कार्यक्रमासाठी कोणतेही प्रवेशशुल्क ठेवण्यात आलेले नाही. तिकीट किंवा प्रवेशिका आवश्यक नाही. नागरिक, भाविक, तरुण आणि कुटुंबांनी ठक्कर डोम येथे मोठ्या संख्येने उपस्थित राहावे.”
शबद कीर्तनासाठी भाविकांना विशेष आवाहन
शबद कीर्तनाच्या वेळी आध्यात्मिक भाव जपण्यासाठी उपस्थित भाविकांनी डोक्यावर रुमाल, पदर किंवा ओढणीसदृश वस्त्र ठेवावे, अशी विनंती आयोजकांकडून करण्यात आली आहे.
तसेच कार्यक्रमाचे पावित्र्य आणि परिसरातील स्वच्छता व शिस्त कायम ठेवण्यासाठी गुटखा, पान, बिडी, सिगारेट तसेच तंबाखूजन्य पदार्थ कार्यक्रमस्थळी आणू नयेत, असे आवाहन करण्यात आले आहे.
पार्किंग आणि वाहतुकीचे नियोजन
कार्यक्रमासाठी येणाऱ्या नागरिकांच्या सोयीसाठी पार्किंग, वाहतूक आणि गर्दी व्यवस्थापनाचे नियोजन संबंधित यंत्रणांच्या समन्वयाने करण्यात येत आहे.
नागरिकांनी आपली वाहने निर्देशित पार्किंग ठिकाणीच उभी करावीत. तसेच वाहतूक पोलिस आणि कार्यक्रमातील कर्मचाऱ्यांच्या सूचनांचे पालन करावे, असे आवाहन करण्यात आले आहे.
सायंकाळच्या कार्यक्रमांना मोठी गर्दी होण्याची शक्यता असल्याने नागरिकांनी कार्यक्रमाच्या वेळेपूर्वी ठक्कर डोम येथे पोहोचावे, असे प्राधिकरणाने सांगितले आहे.
‘भक्ती संमेलन’मध्ये संतपरंपरेवर मंथन
२९ ऑगस्ट रोजी होणाऱ्या ‘भक्ती संमेलना’त दोन सत्रांमध्ये संतपरंपरेच्या विविध पैलूंवर चर्चा होणार आहे.
पहिल्या सत्राचा विषय ‘सिंहस्थ महाकुंभमेळा : भारतीय संत आणि समरसता’ असा आहे. ह.भ.प. श्री. पराग महाराज चातुर्मासे हे सत्र समन्वयक असतील. या सत्रात ह.भ.प. श्री. शिवाजी महाराज मोरे, श्री. ष. बृ. प्र. डॉ. वीरुपाक्ष शिवाचार्य महास्वामीजी, श्री. महंत श्रीमानस शास्त्री, श्री. सुदर्शन महाराज कपाटे, ह.भ.प. सौ. सुप्रियाताई साठे आणि ह.भ.प. श्री. प्रमोद महाराज जगताप सहभागी होणार आहेत.
दुसऱ्या सत्राचा विषय ‘सिंहस्थ महाकुंभमेळा : राष्ट्रीयदृष्ट्या संतपरंपरेचा सहभाग आणि समन्वय’ असा आहे. डॉ. सदानंद मोरे हे सत्र समन्वयक असतील. या सत्रात ह.भ.प. श्री. राणा महाराज वासकर, ह.भ.प. डॉ. द्वाराचार्य, महामंडलेश्वर रामकृष्णदास महाराज लहवितकर, श्री. जनार्दन हरिजी महाराज, ह.भ.प. श्री. रामकृष्ण महाराज वीर, श्री. मंदार बुवा रामदासी आणि भागवताचार्य प. पू. महंत श्री. चिरडे बाबा सहभागी होणार आहेत.