तिघे जेरबंद; ४५ हजारांचे सोन्याचे दागिने हस्तगत
नाशिक | प्रतिनिधी
नाशिकरोड पोलिसांनी मध्यरात्रीच्या गस्तीदरम्यान दरोड्याचा कट उधळून लावत तीन संशयितांना अटक केली. त्यानंतर आरोपींच्या चौकशीत जेलरोड परिसरातील वृद्ध महिलेच्या घरात घुसून केलेल्या जबरी चोरीचा गुन्हाही उघडकीस आला. या प्रकरणात पोलिसांनी ४५ हजार रुपये किमतीचे सोन्याचे दागिने हस्तगत केले आहेत.
याबाबतची माहिती पोलीस उपायुक्त (परिमंडळ-२) किशोर काळे आणि सहायक पोलीस आयुक्त अद्विता शिंदे यांनी पत्रकार परिषदेत दिली.
वरिष्ठ पोलीस निरीक्षक जितेंद्र सपकाळे, पोलीस निरीक्षक (गुन्हे) अतुल चौधरी आणि पोलीस निरीक्षक घनदाट यांच्या मार्गदर्शनाखाली गुन्हे शोध पथक ८ जुलैच्या मध्यरात्री गस्त घालत होते. त्यावेळी डायल ११२ वरून सिन्नरफाटा येथील सिटी लिंक बस डेपो परिसरात काही संशयित इसम लपून बसल्याची माहिती मिळाली.
माहितीच्या आधारे सहाय्यक पोलीस निरीक्षक प्रवीण सूर्यवंशी आणि त्यांच्या पथकाने घटनास्थळी धाव घेतली. पोलिसांना पाहताच संशयितांनी पळ काढण्याचा प्रयत्न केला. मात्र पाठलाग करून साहेबराव गोविंद डोंगरे, रामदास देविदास सूर्यवंशी आणि गणेश भिकाजी खेडकर या तिघांना ताब्यात घेण्यात आले. त्यांच्या अंगझडतीत दोरी, मिरची पूड, लोखंडी करवत आणि कटवणी असा दरोड्यासाठी वापरला जाणारा मुद्देमाल जप्त करण्यात आला. त्यांच्या दोन साथीदारांनी अंधाराचा फायदा घेत घटनास्थळावरून पलायन केले.
दरम्यान, पोलीस कोठडीत आरोपी रामदास सूर्यवंशी याची कसून चौकशी केली असता त्याने साथीदार करण घुगे याच्यासह ७ जुलै रोजी जेलरोड परिसरातील पाण्याच्या टाकीजवळ राहणाऱ्या एका वृद्ध महिलेच्या घरात घुसून तिच्या अंगावरील सोन्याचे कानातील टॉप्स आणि मंगळसूत्र जबरदस्तीने हिसकावून नेल्याची कबुली दिली.
यानंतर पोलिसांनी आरोपींकडून ४५ हजार रुपये किमतीचे सोन्याचे दागिने जप्त केले. या प्रकरणी नाशिकरोड पोलीस ठाण्यात जबरी चोरीचा गुन्हा यापूर्वीच दाखल असून, आरोपींकडून आणखी गुन्ह्यांची उकल होण्याची शक्यता पोलिसांनी व्यक्त केली आहे.
ही कारवाई वरिष्ठ पोलीस निरीक्षक जितेंद्र सपकाळे, पोलीस निरीक्षक (गुन्हे) अतुल चौधरी आणि पोलीस निरीक्षक घनदाट यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक प्रवीण सूर्यवंशी, पोलीस हवालदार विशाल पाटील, नितीन भामरे, सागर आडणे, महेंद्र जाधव, नाना पानसरे, अरुण गाडेकर, योगेश रानडे, विशाल कुंवर, समाधान वाजे, रोहित शिंदे, अजय देशमुख, दीपक दिवटे तसेच सीआर मोबाईलचे पोलीस शिपाई अर्जुन गिते आणि मंगेश बोडके यांनी यशस्वीपणे पार पाडली.