नाशिक : गस्तीदरम्यान दरोड्याचा कट उधळला; चौकशीत वृद्धेच्या जबरी चोरीचा गुन्हा उघड, तिघे अटकेत

नाशिक : गस्तीदरम्यान दरोड्याचा कट उधळला; चौकशीत वृद्धेच्या जबरी चोरीचा गुन्हा उघड, तिघे अटकेत

नाशिक | प्रतिनिधी

नाशिकरोड पोलिसांनी मध्यरात्रीच्या गस्तीदरम्यान दरोड्याचा कट उधळून लावत तीन संशयितांना अटक केली. या आरोपींपैकी एकाची कसून चौकशी केल्यानंतर जेलरोड परिसरातील वृद्ध महिलेच्या घरात घुसून केलेल्या जबरी चोरीचा गुन्हाही उघडकीस आला. पोलिसांनी या गुन्ह्यातील सुमारे ४५ हजार रुपयांचे सोन्याचे दागिने जप्त केले आहेत.

पोलीस उपायुक्त (परिमंडळ-२) किशोर काळे आणि सहायक पोलीस आयुक्त अद्विता शिंदे यांनी पत्रकार परिषदेत ही माहिती दिली.

वरिष्ठ पोलीस निरीक्षक जितेंद्र सपकाळे, पोलीस निरीक्षक (गुन्हे) अतुल चौधरी आणि पोलीस निरीक्षक घनदाट यांच्या मार्गदर्शनाखाली गुन्हे शोध पथक ८ जुलैच्या मध्यरात्री गस्त घालत होते. त्यावेळी डायल ११२ वरून सिन्नरफाटा येथील सिटी लिंक बस डेपो परिसरात काही संशयित व्यक्ती लपून बसल्याची माहिती मिळाली.

यानंतर सहाय्यक पोलीस निरीक्षक प्रवीण सूर्यवंशी यांच्या पथकाने घटनास्थळी धाव घेतली. पोलिसांना पाहताच संशयितांनी पळ काढण्याचा प्रयत्न केला. मात्र, पाठलाग करून साहेबराव गोविंद डोंगरे, रामदास देविदास सूर्यवंशी आणि गणेश भिकाजी खेडकर यांना ताब्यात घेण्यात आले.

आरोपींच्या झडतीत दोरी, मिरची पूड, लोखंडी करवत आणि कटवणी असे दरोड्यासाठी वापरले जाणारे साहित्य जप्त करण्यात आले. दरम्यान, त्यांच्या दोन साथीदारांनी अंधाराचा फायदा घेत घटनास्थळावरून पलायन केले.

चौकशीत वृद्धेच्या जबरी चोरीचा गुन्हा उघड

पोलीस कोठडीत आरोपी रामदास सूर्यवंशी याची चौकशी केली असता, त्याने साथीदार करण घुगे याच्यासह ७ जुलै रोजी जेलरोड पाण्याच्या टाकीजवळील एका वृद्ध महिलेच्या घरात घुसून तिच्या अंगावरील सोन्याचे टॉप्स आणि मंगळसूत्र जबरदस्तीने चोरल्याची कबुली दिली.

त्यानंतर पोलिसांनी आरोपींकडून ४५ हजार रुपये किमतीचे सोन्याचे दागिने हस्तगत केले. या प्रकरणी नाशिकरोड पोलीस ठाण्यात जबरी चोरीचा गुन्हा यापूर्वीच दाखल असून, आरोपींकडून आणखी काही गुन्हे उघडकीस येण्याची शक्यता पोलिसांनी व्यक्त केली आहे.

पोलिसांच्या पथकाची यशस्वी कारवाई

ही कारवाई वरिष्ठ पोलीस निरीक्षक जितेंद्र सपकाळे, पोलीस निरीक्षक (गुन्हे) अतुल चौधरी आणि पोलीस निरीक्षक घनदाट यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक प्रवीण सूर्यवंशी तसेच पोलीस हवालदार विशाल पाटील, नितीन भामरे, सागर आडणे, महेंद्र जाधव, नाना पानसरे, अरुण गाडेकर, योगेश रानडे, विशाल कुंवर, समाधान वाजे, रोहित शिंदे, अजय देशमुख, दीपक दिवटे तसेच सीआर मोबाईलचे पोलीस शिपाई अर्जुन गिते आणि मंगेश बोडके यांनी यशस्वीपणे पार पाडली.

नाशिक, Nashik News, Nashik Crime News, नाशिकरोड पोलीस, दरोड्याचा कट, जबरी चोरी, वृद्ध महिलेची चोरी, Crime News Maharashtra, Maharashtra Police, Breaking News Nashik