इगतपुरी | प्रतिनिधी
आगामी सिंहस्थ महाकुंभाच्या पार्श्वभूमीवर श्री कपिल महामुनी आश्रम ट्रस्ट, श्री क्षेत्र कपिलधारा तीर्थ, स्वर्ग आश्रम, सिंहस्थ कुंभमेळा मूळ स्थान, कावनाई (ता. इगतपुरी, जि. नाशिक) यांच्या वतीने रविवार, दि. २६ जुलै २०२६ रोजी सकाळी ८.४८ वाजता वैदिक परंपरेनुसार भूमिपूजन, वृक्षारोपण तसेच गंगा-गोदावरी पूजन या पवित्र धार्मिक सोहळ्याचे आयोजन करण्यात आले आहे.
हा धार्मिक सोहळा श्री क्षेत्र कपिलधारा तीर्थ, स्वर्ग आश्रम, गोदावरी व कपिला नदीच्या गुप्त पवित्र संगमस्थळी तसेच सांख्य योगाच्या उगमस्थान म्हणून ओळखल्या जाणाऱ्या पावन भूमीवर मान्यवरांच्या शुभहस्ते संपन्न होणार आहे.
कार्यक्रमादरम्यान वैदिक मंत्रोच्चार, धार्मिक विधी, भूमिपूजन, वृक्षारोपण आणि गंगा-गोदावरी पूजन असे विविध धार्मिक कार्यक्रम पार पडणार असून भाविकांना आध्यात्मिक वातावरणाचा लाभ घेण्याची संधी मिळणार आहे. आगामी सिंहस्थ महाकुंभाच्या तयारीच्या दृष्टीने हा सोहळा विशेष महत्त्वाचा मानला जात आहे.
या पवित्र कार्यक्रमासाठी राज्यभरातील भाविक, साधू-संत, महंत, सामाजिक कार्यकर्ते आणि धर्मप्रेमी नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित राहणार असल्याची अपेक्षा व्यक्त करण्यात आली आहे.
श्री कपिल महामुनी आश्रम ट्रस्ट, श्री क्षेत्र कपिलधारा तीर्थ, महंत फलहरी बाबा महाराज तसेच जगतगुरु कल्कीराम महाराज यांच्या वतीने सर्व भाविक, धर्मप्रेमी नागरिक आणि परिसरातील जनतेला या धार्मिक सोहळ्यास उपस्थित राहून पुण्यलाभ घेण्याचे आवाहन करण्यात आले आहे.
