Nashik Local Authorities Constituency Election | Mahayuti News | Gokul Gite Rebellion
नाशिक : नाशिक स्थानिक स्वराज्य संस्था मतदारसंघाच्या विधान परिषद निवडणुकीत ( MLC Election) माघारीच्या अंतिम दिवशी मोठा राजकीय ट्विस्ट पाहायला मिळाला. भाजपचे अधिकृत दावेदार गणेश गिते यांनी पक्षश्रेष्ठींच्या आदेशानुसार उमेदवारी अर्ज मागे घेतला असला, तरी त्यांचे बंधू गोकुळ गिते यांनी अपक्ष उमेदवारी कायम ठेवत महायुतीसमोर नवे आव्हान उभे केले आहे.
यामुळे आता विधान परिषद निवडणुकीत ( MLC Election) महायुतीचे उमेदवार नरेंद्र दराडे आणि अपक्ष उमेदवार गोकुळ गिते यांच्यात प्रतिष्ठेची लढत रंगणार असल्याचे चित्र स्पष्ट झाले आहे.
“माझा बाप काढणाऱ्यांसाठी माघार घेणार नाही”
माघारीच्या मुदतीपूर्वी गोकुळ गिते यांच्याशी संपर्क साधून उमेदवारी मागे घेण्याचा प्रयत्न करण्यात आला. मात्र त्यांनी स्पष्ट शब्दांत नकार देत संतप्त प्रतिक्रिया दिली.
“ज्यांनी माझा बाप काढला, त्यांच्यासाठी मी माघार का घ्यायची?” असा सवाल करत गोकुळ गिते यांनी निवडणूक लढवण्याचा निर्धार जाहीर केला.
या वक्तव्यामुळे महायुतीतील अंतर्गत नाराजी उघडपणे समोर आली असून राजकीय वर्तुळात मोठी चर्चा सुरू झाली आहे.
दराडे कुटुंबीयांवर गंभीर आरोप
गोकुळ गिते यांनी आरोप केला की, महायुतीचे उमेदवार नरेंद्र दराडे यांचे पुत्र कुणाल दराडे यांनी अपमानास्पद भाषेचा वापर केला. “गितेंच्या बापालाही माघार घ्यावी लागेल,” अशा प्रकारचे वक्तव्य करण्यात आल्याचा आरोप त्यांनी केला.
याशिवाय नरेंद्र दराडे यांच्या कुटुंबीयांनी उर्मट भाषेत बोलल्यामुळे गिते कुटुंबीय दुखावल्याचेही त्यांनी सांगितले.
गणेश गितेंचाही संताप
दरम्यान, उमेदवारी अर्ज मागे घेतल्यानंतर माध्यमांशी संवाद साधताना गणेश गिते यांनीही नाराजी व्यक्त केली.
“निवडणूक सुरू होण्यापूर्वीच आमच्या आई-वडिलांचा अपमान करण्यात आला. आमचाही राजकीय बाप देवेंद्र फडणवीस आहेत, हे विसरू नका,” असा इशारा त्यांनी दिला.
गणेश गिते यांनी स्वतः गोकुळ गिते यांची समजूत काढण्याचा प्रयत्न केला. मात्र माघारीची मुदत संपेपर्यंत गोकुळ गिते जिल्हाधिकारी कार्यालयात पोहोचले नाहीत.
MLC Election अंतिम रिंगणात तीन उमेदवार
माघारीनंतर राष्ट्रवादी काँग्रेसकडून उमेदवारी अर्ज दाखल केलेले गोरख बोडके आणि विष्णुपंत म्हैसधुणे यांनी अर्ज मागे घेतले.
त्यामुळे आता अंतिम रिंगणात पुढील तीन उमेदवार राहिले आहेत:
- महायुतीचे नरेंद्र दराडे
- अपक्ष गोकुळ गिते
- भाजपचे प्रसाद हिरे
प्रतिष्ठेची लढत ठरणार?
महायुतीच्या अधिकृत उमेदवाराविरोधातच गिते कुटुंबीयांचा उघड रोष समोर आल्याने ही निवडणूक केवळ राजकीय राहिलेली नाही. स्थानिक स्वराज्य संस्था मतदारसंघातील ही लढत आता प्रतिष्ठेची बनली असून “दराडे विरुद्ध गिते” हा सामना निवडणुकीचा केंद्रबिंदू ठरणार असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात रंगू लागली आहे.