Dindori Rain News : वादळी वाऱ्यासह अवकाळी पावसाचा दिंडोरी तालुक्याला तडाखा; सौर कृषी वहिनी प्रकल्पांसह शेतीचे मोठे नुकसान

Dindori Weather News | Unseasonal Rain in Nashik | Solar Agriculture Feeder Project Damage

वणी प्रतिनिधी : नाशिक जिल्ह्यातील दिंडोरी तालुक्याला बुधवारी सायंकाळी झालेल्या वादळी वाऱ्यासह अवकाळी पावसाचा Rain जोरदार फटका बसला. एकलहरे, पिंप्री आंचला, चौसाळे, खोरीफाटा, निगडोळ आणि वारे परिसरात झालेल्या या नैसर्गिक आपत्तीमुळे शेतीपिकांसह राज्य सरकारच्या सौर कृषी वहिनी योजनेअंतर्गत उभारण्यात आलेल्या सौर ऊर्जा प्रकल्पांचे मोठे नुकसान झाल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे.

वादळी वाऱ्यामुळे सौर प्रकल्पांचे नुकसान (Rain)

दिवसभर उकाड्याने त्रस्त झालेल्या नागरिकांना पावसामुळे काहीसा दिलासा मिळाला. मात्र, अचानक आलेल्या वादळी वाऱ्याने अनेक ठिकाणी मोठी हानी घडवून आणली. विशेषतः एकलहरे परिसरातील सौर कृषी वहिनी योजनेअंतर्गत उभारण्यात आलेल्या सौर ऊर्जा प्रकल्पांमधील सौर पॅनेल, लोखंडी संरचना आणि अन्य यंत्रसामग्रीचे नुकसान झाले आहे.

काही ठिकाणी सौर पॅनेल उखडून पडल्याने प्रकल्पांचे कामकाज विस्कळीत झाले असून, नुकसानीचा आकडा अद्याप स्पष्ट नसला तरी तो मोठ्या प्रमाणात असल्याचा अंदाज व्यक्त केला जात आहे.

WhatsApp Image 2026 06 04 at 4.09.43 PM

Rain : झाडे उन्मळून पडली, वीजवाहिन्यांचेही नुकसान

ताशी वेगाने वाहणाऱ्या वाऱ्यामुळे अनेक ठिकाणी झाडे उन्मळून पडली. काही भागांत वीजवाहिन्यांचे नुकसान झाल्याने वीजपुरवठाही विस्कळीत झाला. शेतातील संरक्षक बांधकामे, शेड आणि अन्य सुविधांचेही नुकसान झाल्याची माहिती मिळत आहे.

खोरीफाटा मार्केट कमिटीच्या शेडचे नुकसान

खोरीफाटा येथील मार्केट कमिटीच्या शेडचेही मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. वाऱ्याच्या तडाख्यामुळे शेडचा काही भाग उडाल्याने व्यापारी आणि शेतकऱ्यांमध्ये चिंता व्यक्त केली जात आहे.

कांदा, भाजीपाला आणि फळबागांना फटका

अवकाळी पावसामुळे परिसरातील शेतकऱ्यांच्या पिकांचेही मोठे नुकसान झाले आहे. कांदा, भाजीपाला, आंबा बागा तसेच विविध फळबागांना या पावसाचा फटका बसल्याची माहिती शेतकऱ्यांनी दिली. अनेक ठिकाणी उभ्या पिकांवर वाऱ्यामुळे आणि पावसामुळे परिणाम झाला असून, शेतकऱ्यांनी तातडीने पंचनामे करून नुकसानभरपाई देण्याची मागणी केली आहे.

प्रशासनाचा पाहणी दौरा सुरू

स्थानिक प्रशासन आणि महसूल विभागाच्या पथकांनी नुकसानग्रस्त भागांची पाहणी सुरू केली असून, लवकरच पंचनामे करण्यात येणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. नुकसानीचा अंतिम अहवाल आल्यानंतर मदतीबाबत निर्णय घेतला जाणार आहे.

शेतकरी आणि प्रकल्प चालकांमध्ये चिंता

अवकाळी पावसाच्या या तडाख्यामुळे दिंडोरी तालुक्यातील शेतकरी तसेच सौर ऊर्जा प्रकल्प चालकांमध्ये चिंतेचे वातावरण निर्माण झाले आहे. वर्षभराच्या मेहनतीवर पाणी फिरल्याची भावना अनेक शेतकऱ्यांनी व्यक्त केली.

“पावसाचे काही थेंब दिलासा देतात, पण अवकाळी पावसाचा एक झटका वर्षभराचे कष्ट वाऱ्यावर उडवून नेतो,” अशी प्रतिक्रिया नुकसानग्रस्त नागरिकांनी व्यक्त केली.