सोमवारी (9 जून 2025) सकाळी मुंबईच्या दिवा आणि मुंब्रा स्थानकांदरम्यान एक दुर्दैवी लोकल रेल्वे अपघात घडला. सकाळी साडेनऊच्या सुमारास (9:30 AM) दोन लोकल ट्रेन अगदी समांतरपणे जात असताना, दरवाज्याजवळ उभ्या असलेल्या प्रवाशांच्या बॅगांमुळे एकमेकांना धक्का लागला आणि अनेक प्रवासी थेट ट्रॅकवर कोसळले.
या अपघातात चार प्रवाशांचा मृत्यू, तर नऊ जण गंभीर जखमी झाल्याची माहिती मिळाली आहे. जखमींना तातडीने उपचारासाठी रुग्णालयात हलवण्यात आले.
या घटनेनंतर काही तासांतच, नाशिकरोड रेल्वे स्थानकावर आणखी एक रेल्वे अपघात घडल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे.
Haridwar Express Accident: नाशिकरोड स्थानकावर चढताना हात सटकला, प्रवासी खाली पडून गंभीर जखमी
नाशिकरोड स्टेशनवर, हरिद्वार एक्सप्रेस मध्ये चढण्याचा प्रयत्न करत असताना एक प्रवासी प्लॅटफॉर्मवरून घसरून खाली पडला आणि गंभीर जखमी झाला. तो प्रवासादरम्यान गाडीत चढत असताना अचानक त्याचा हात सटकला आणि तो ट्रेनच्या हालचालीमुळे थेट ट्रॅकवर कोसळला.
घटनेनंतर स्थानकावर गोंधळाची परिस्थिती निर्माण झाली. रेल्वे पोलीस तत्काळ घटनास्थळी पोहोचले आणि जखमी प्रवाशाला रुग्णालयात दाखल करण्यात आले.
रेल्वेचे वरिष्ठ अधिकारी सुनील अहिरे यांनी सांगितले की, “गाडी सुरू असतानाच प्रवासी चढण्याचा प्रयत्न करत होता. त्याचा हात अडकला, आम्ही तात्काळ चेन ओढून गाडी थांबवली आणि त्याला बाहेर काढले.”
प्रवाशाची ओळख अद्याप स्पष्ट झालेली नाही, तसेच रेल्वे प्रशासन या घटनेचा तपास करत आहे.