Trimbakeshwar News : त्र्यंबकेश्वर मंदिरात २,५०० रुपयांच्या VIP दर्शनावरून गोंधळ; सामान्य भाविकांवर अन्यायाचा आरोप

दोन दिवसांत लाखोंची कमाई; व्हीव्हीआयपी दर्शनासाठी मोठी गर्दी, सामान्य दर्शनबारीत भाविकांची गैरसोय

Trimbakeshwar : जगप्रसिद्ध त्र्यंबकेश्वर Trimbakeshwar ज्योतिर्लिंग मंदिरात सुरू करण्यात आलेल्या २,५०० रुपयांच्या व्हीव्हीआयपी तातडी दर्शन व्यवस्थेमुळे शनिवारी (३० मे) आणि रविवारी (३१ मे) मोठा गोंधळ उडाल्याचे चित्र पाहायला मिळाले. नव्या दर्शन व्यवस्थेच्या नियोजनाअभावी सामान्य भाविकांना तासन्तास प्रतीक्षा करावी लागत असल्याच्या तक्रारी समोर आल्या आहेत.

मंदिराच्या उत्तर दरवाजासमोर सकाळपासूनच थेट दर्शनाचा आग्रह धरणारे भाविक आणि २,५०० रुपयांचे तिकीट काढून तातडीने दर्शन घेण्यास इच्छुक असलेल्या भाविकांची मोठी गर्दी झाली होती. व्हीव्हीआयपी दर्शनासाठी विश्वस्त मंडळाने स्वतंत्र मंडपाची व्यवस्था केली होती. दुपारनंतर या दर्शनबारीसाठी मोठी रांग लागल्याने परिस्थिती अधिकच गोंधळाची बनली.

मिळालेल्या माहितीनुसार, एका दिवसात सुमारे ५०० भाविकांना २,५०० रुपयांच्या विशेष दर्शनाचा लाभ देण्याचे नियोजन करण्यात आले आहे. मात्र, या सुविधेसाठी हजाराहून अधिक भाविक इच्छुक असल्याचे दोन दिवसांच्या गर्दीतून स्पष्ट झाले.

Trimbakeshwar Temple एका दिवसात १४ लाखांची कमाई?

शनिवारी केवळ एका दिवसात विशेष दर्शन व्यवस्थेतून त्र्यंबकेश्वर Trimbakeshwar मंदिर देवस्थान ट्रस्टला सुमारे १४ लाख रुपयांचे उत्पन्न मिळाल्याची चर्चा भाविकांमध्ये रंगली. यामुळे मंदिर प्रशासनाच्या उत्पन्नात मोठी वाढ झाली असली, तरी सामान्य दर्शनबारीतील भाविकांवर त्याचा परिणाम होत असल्याची भावना व्यक्त केली जात आहे.

सामान्य भाविकांचा वेळ ‘VIP’साठी अडवला जातो?

भाविकांच्या म्हणण्यानुसार, २,५०० रुपयांचे तिकीट घेणाऱ्या व्यक्तीला थेट गर्भगृहापर्यंत नेले जाते आणि त्याला निवांत दर्शन घडवले जाते. मात्र, या प्रक्रियेदरम्यान पूर्व दरवाजा आणि २०० रुपयांच्या दर्शनबारीतील भाविकांना काही काळ थांबवले जाते.

एका व्हीव्हीआयपी भाविकासाठी लागणाऱ्या वेळेत किमान १० ते २० सामान्य भाविकांचे दर्शन होऊ शकते. अशा परिस्थितीत दररोज ५०० व्हीव्हीआयपी भाविकांमुळे हजारो सामान्य भाविकांच्या दर्शनावर परिणाम होत असल्याचा आरोप होत आहे.

रात्री उशिरापर्यंत दर्शन, पण सुविधांचा अभाव

सामान्य दर्शनबारीसाठी रात्री ९ वाजण्यापूर्वी प्रवेश बंद केला जातो. मात्र, दर्शनमंडपात असलेल्या शेवटच्या भाविकाचे दर्शन होईपर्यंत मंदिरातील गर्भगृह खुले ठेवले जाते. शनिवार आणि रविवारी रात्री १२ नंतरही दर्शन सुरू होते.

रात्री उशिरा दर्शन घेऊन बाहेर पडणाऱ्या भाविकांसाठी जेवण, वाहतूक आणि प्रकाशयोजनेच्या सुविधा अपुऱ्या असल्याची तक्रारही पुढे आली आहे. मंदिर परिसरात सुरू असलेल्या खोदकामामुळे अंधारात भाविकांना मार्ग शोधताना अडचणींचा सामना करावा लागत आहे.

‘दर्शनाचा काळाबाजार’ मान्य?

विशेष दर्शनबारी सुरू करण्यामागील उद्देश दर्शनाचा काळाबाजार रोखणे असल्याचे मंदिर प्रशासनाने स्पष्ट केले आहे. मात्र, यामुळे पूर्वी मंदिर परिसरात दर्शनासाठी अनधिकृत आर्थिक व्यवहार होत असल्याचे अप्रत्यक्षपणे मान्य करण्यात आल्याची चर्चा आता सुरू झाली आहे.

विशेष दर्शनातून एका दिवसात लाखो रुपयांचे उत्पन्न मिळत असल्याने ही व्यवस्था कायम राहणार का, आणि सामान्य भाविकांच्या सुविधांसाठी कोणती उपाययोजना होणार, याकडे आता भाविकांचे लक्ष लागले आहे.