मुंबई : मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण (Ladki Bahin Yojana) योजनेतून तब्बल 80 लाख महिलांना अपात्र ठरवण्यात आल्याची माहिती समोर आल्यानंतर राज्याच्या राजकारणात नवा वाद निर्माण झाला आहे. या निर्णयावर राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार) पक्षाचे ज्येष्ठ नेते जयंत पाटील यांनी सरकारवर जोरदार टीका केली आहे.
विधानसभा निवडणुकीपूर्वी महिलांना सरसकट लाभ देण्यात आला, मात्र आता लाभार्थ्यांची संख्या कमी करण्यासाठी सरकारकडून चाळणी लावली जात आहे. लाडकी बहीण Ladki Bahin Yojana योजनेतील लाभार्थ्यांची संख्या आता 1 कोटी 66 लाखांवर आली आहे.
“पुढील वर्षभरात आणखी 50 ते 60 लाख महिला अपात्र ठरू शकतात”
जयंत पाटील यांनी दावा केला की, सरकारला या योजनेवरील आर्थिक भार कमी करायचा आहे. त्यामुळे आगामी काळात आणखी 50 ते 60 लाख महिलांना अपात्र ठरवले जाऊ शकते.
त्यांच्या मते, निवडणुकीच्या तोंडावर महिलांना मोठ्या प्रमाणात आर्थिक मदत देण्यात आली आणि त्याच महिलांनी महायुती सरकारला सत्तेत आणण्यात महत्त्वाची भूमिका बजावली. मात्र आता त्याच लाभार्थ्यांना योजनेतून बाहेर काढले जात आहे.
Ladki Bahin Yojana “बोगस लाभार्थी होते हे आधी कळले नाही का?”
सरकारच्या भूमिकेवर प्रश्नचिन्ह उपस्थित करत जयंत पाटील म्हणाले की, जर लाभार्थ्यांमध्ये बोगस नावे होती, तर ती सुरुवातीपासूनच ओळखण्यात सरकार अपयशी का ठरले?
“दोन वर्षे या महिलांच्या खात्यात पैसे जमा होत होते. जर त्या बोगस असतील, तर त्याची जबाबदारी संबंधित प्रशासन आणि सरकारचीच आहे,” असेही त्यांनी स्पष्ट केले.
आर्थिक संकटाचे संकेत?
जयंत पाटील यांनी सोशल मीडिया प्लॅटफॉर्म एक्सवर पोस्ट करत राज्याच्या आर्थिक स्थितीबाबतही चिंता व्यक्त केली. त्यांनी म्हटले की, 80 लाख महिलांना अपात्र ठरवण्याचा निर्णय हा राज्यावरील आर्थिक ताणाचे द्योतक आहे.
राज्यातील वाढती वित्तीय तूट आणि जागतिक आर्थिक मंदीचा परिणाम सरकारच्या आर्थिक धोरणांवर होत असल्याचा आरोप त्यांनी केला. भविष्यात टप्प्याटप्प्याने लाभार्थी कमी करून ही योजना बंद करण्याचाही प्रयत्न होऊ शकतो, अशी शक्यता त्यांनी व्यक्त केली.
नियोजनाच्या अभावावर टीका
जयंत पाटील यांच्या मते, योजनेचे योग्य नियोजन सुरुवातीपासून केले असते तर आज अशी परिस्थिती निर्माण झाली नसती. लाभार्थ्यांची पात्रता आधीच तपासली असती, तर लाखो महिलांना अपात्र ठरवण्याची वेळ आली नसती.