उपनगर पोलिसांच्या गुन्हे शोध पथकाची धडक कारवाई
Nashik | प्रतिनिधी
नाशिकरोड परिसरातील देवळालीगाव येथे भररात्री झालेल्या गोळीबार प्रकरणातील मुख्य आरोपीला उपनगर पोलिसांच्या गुन्हे शोध पथकाने शिर्डीतून अटक केली आहे. आरोपीकडून गुन्ह्यात वापरण्यात आलेला गावठी कट्टा जप्त करण्यात आला असून या कारवाईमुळे परिसरात खळबळ उडाली आहे.
जुन्या वादातून तरुणावर गोळीबार
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, रितिक राजेंद्र पारचे (वय २५, रा. एनएमसी क्वार्टर, गांधीधाम, देवळालीगाव, नाशिकरोड) हा मजुरी करून उदरनिर्वाह करतो. बुधवारी (दि. ३) रात्री जुन्या वादाची कुरापत काढत काही संशयितांनी त्याला अडवले.
“या भागात आमचीच भाईगिरी चालेल,” असे म्हणत संशयितांनी रितिकच्या दिशेने गावठी कट्ट्यातून थेट गोळीबार केला. अचानक झालेल्या या प्रकारामुळे परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले. मात्र सुदैवाने रितिक या हल्ल्यातून बचावला.
तिघांविरोधात गुन्हा दाखल
घटनेनंतर रितिक पारचे यांनी दिलेल्या फिर्यादीवरून राहुल निकम, किशोर उर्फ किशा निकम (दोघे रा. एनएमसी क्वार्टर, देवळालीगाव) तसेच त्यांच्या एका अनोळखी साथीदाराविरोधात उपनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला.
तांत्रिक विश्लेषणातून आरोपीचा शोध
गुन्ह्याचे गांभीर्य लक्षात घेऊन Nashik पोलीस आयुक्त संदीप कर्णिक, पोलीस उपायुक्त किशोर काळे आणि सहाय्यक पोलीस आयुक्त संगीता निकम यांच्या मार्गदर्शनाखाली वरिष्ठ पोलीस निरीक्षक जयंत शिरसाठ आणि संजय फुलपगारे यांनी तपास सुरू केला.
गुन्हे शोध पथकाचे पोलीस उपनिरीक्षक प्रभाकर सोनवणे यांनी तांत्रिक विश्लेषणाच्या आधारे आरोपी गुन्हा करून अहिल्यानगर जिल्ह्यात पळून गेल्याची माहिती मिळवली. त्यानंतर पोलिसांनी विविध ठिकाणी शोधमोहीम राबवली.
शिर्डीत फिल्मी स्टाईलने अटक
५ जून रोजी मध्यरात्री मुख्य संशयित किशोर निकम हा शिर्डी परिसरात असल्याची खात्रीशीर माहिती पोलिसांना मिळाली. त्यानुसार सावळी विहीर परिसरात सापळा रचण्यात आला.
पोलिसांची चाहूल लागताच आरोपीने पळून जाण्याचा प्रयत्न केला. मात्र गुन्हे शोध पथकाने शिताफीने पाठलाग करून त्याला ताब्यात घेतले.
३० हजारांचा गावठी कट्टा जप्त
अटकेनंतर आरोपीकडून सुमारे ३० हजार रुपये किमतीचा गावठी कट्टा जप्त करण्यात आला. या प्रकरणाचा पुढील तपास उपनगर पोलीस करत आहेत.
