BSNL Cable Theft Nashik : बीएसएनएलची 35 लाखांची भूमिगत केबल चोरी; पोलिसांनी 1.05 कोटींचा मुद्देमाल जप्त, चौघांना अटक

Nashik Crime News | BSNL Cable Theft Case | Nashik Road Police Action

नाशिक : भारत संचार निगम लिमिटेड (BSNL) कंपनीची लाखो रुपयांची भूमिगत केबल चोरी करणाऱ्या टोळीचा नाशिकरोड पोलिसांनी पर्दाफाश केला असून, चोरीसाठी वापरण्यात आलेला जेसीबी आणि मालवाहू टेम्पोसह तब्बल 1 कोटी 5 लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे. या प्रकरणात चार जणांना अटक करण्यात आली असून, त्यांच्याकडून आणखी गुन्ह्यांची उकल होण्याची शक्यता पोलिसांनी व्यक्त केली आहे.

Nashik बिटको चौकातून 35 लाखांची केबल लंपास

पोलीस उपायुक्त किशोर काळे यांनी दिलेल्या माहितीनुसार, 30 मे रोजी रात्री ते 31 मेच्या सकाळी दरम्यान नाशिकरोड येथील बिटको चौकातील संजय मेडिकलसमोरील बीएसएनएलच्या भूमिगत केबलची चोरी झाली होती. अज्ञात चोरट्यांनी बीएसएनएलचे सिमेंट चेंबर उघडून त्यामधील सुमारे 35 लाख रुपये किमतीची महागडी यूजी (Underground) केबल यंत्राच्या साहाय्याने ओढून कापून नेली होती.

या प्रकरणी बीएसएनएलचे अधिकारी बाळासाहेब दत्तात्रय कोटकर यांनी नाशिकरोड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला होता.

पोलिसांचा थरारक पाठलाग; तेलाच्या खुणेमुळे लागला सुगावा

गुन्ह्याचा तपास सुरू असताना 1 जून रोजी रात्री सहायक पोलीस निरीक्षक प्रवीण सूर्यवंशी आणि त्यांच्या पथकाने बिटको चौक ते लॅम रोड परिसरात गस्त घालत असताना एक संशयास्पद टेम्पो वेगाने पळताना दिसला.

पोलिसांनी तत्काळ पाठलाग करून टेम्पो अडवला. टेम्पोच्या मागील भागातून तेल गळत असल्याचे पोलिसांच्या निदर्शनास आले. केबल कापताना बाहेर पडलेल्या ऑईलच्या खुणांमुळे पोलिसांचा संशय अधिक बळावला.

त्यानंतर टेम्पोची झडती घेतली असता त्यामध्ये बीएसएनएलच्या केबलचे तुकडे आढळून आले. चौकशीत आरोपींनी चोरीची कबुली दिली.

चोरीसाठी वापरला जेसीबी

तपासादरम्यान आरोपींनी भूमिगत केबल बाहेर काढण्यासाठी जेसीबी मशीनचा वापर केल्याची धक्कादायक माहिती समोर आली. पोलिसांनी गुन्ह्यात वापरलेला जेसीबी, मालवाहू टेम्पो आणि चोरीचा माल जप्त करून एकूण 1.05 कोटी रुपयांचा मुद्देमाल हस्तगत केला.

चौघांना अटक

या प्रकरणात अटक करण्यात आलेल्या आरोपींची नावे पुढीलप्रमाणे आहेत :

  • वाहाब अब्दुल नवाज (मुंबई)
  • सुरेश दिलीप वैराळ (भांडुप, मुंबई)
  • बसंतलाल राजाराम यादव (चेंबूर, मुंबई)
  • कमलेश कुमार सुखदेव रविदास (बिहार) – जेसीबी चालक

न्यायालयाने चारही आरोपींना पोलीस कोठडी सुनावली असून, त्यांनी राज्यातील इतर भागांमध्येही अशाच प्रकारचे गुन्हे केले आहेत का याचा तपास सुरू आहे.

पोलिसांची उल्लेखनीय कामगिरी

Nashik पोलीस आयुक्त संदीप कर्णिक, पोलीस उपायुक्त किशोर काळे आणि सहायक पोलीस आयुक्त डॉ. सचिन बारी यांच्या मार्गदर्शनाखाली नाशिकरोड पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक जितेंद्र सपकाळे व पोलीस निरीक्षक (गुन्हे) अतुल चौधरी यांच्या नेतृत्वाखाली ही कारवाई करण्यात आली.

या मोहिमेत सहायक पोलीस निरीक्षक प्रवीण सूर्यवंशी, हवालदार विशाल पाटील, सागर आडणे, महेंद्र जाधव तसेच पोलीस शिपाई अरुण गाडेकर, रोहित शिंदे आणि योगेश रानडे यांनी महत्त्वाची भूमिका बजावली.